अकोला - रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आयडीबीआय बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी बँकेच्या खिडकीच्या काचा फोडून बँकेत प्रवेश केला होता. यामुळे रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चोरट्यांनी गुरुवारी आयडीबीआय बँकेच्या मुख्य शाखेतील खिडकीचे ग्रील तोडून काच फोडली आणि बँकेमध्ये प्रवेश केला. मात्र, आत प्रवेश केल्यानंतर बँकेतून चोरून नेण्यासारखे काहीच मिळाले नाही. सकाळी बँक उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ही माहिती रामदास पेठ पोलिसांना दिली. पोलिसांसह गुन्हेशोधक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी बँकेच्या आतमध्ये चोरट्यांच्या हाताचे ठसे शोधले. तसेच इतर काही ठिकाणी जावून त्यांनी तपास केला.
दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या बँकेच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच रामदास पेठ पोलीस आणि रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. बँकेचे व्यवस्थापकांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, रात्री उशिरपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.