अकोला - शेतातील पिकांचे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. मात्र, वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्याकरीता शेतीला लोखंडी कुंपण करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तसेच शेतीला लोखंडी तारांच्या माध्यमातून विद्युत प्रवाह लावून शेतीला कुंपण केल्यास वन्यप्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. यावर उपाय म्हणून अकोट तालुक्यातील खापरवाडी येथील एका शेतकऱ्याने विना खर्चाचा रामबाण उपाय शोधला आहे. जगन बगाडे या युवा शेतकऱ्याने निवडूंग वनस्पतीचे जैविक कुंपण करून शेतीतील पिकांना संरक्षण दिले आहे. त्याचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरला आहे.
नैसर्गिक आपत्ती त्यासोबतच वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी नानाविध प्रयोग करतो. परंतु, त्यामध्ये तो यशस्वी होत नाही. शेवटी वन्यप्राण्यांच्या तावडीतून पीक वाचविण्यासाठी शेतकरी शेतात रात्रंदिवस पहारा देतो. तरीही वन्य प्राण्यांचा सुळसुळाट शेतकऱ्यांना शांत बसू देत नाही.
अकोल्यात पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांने शेतात उभे केले नैसर्गिक कुंपण.. खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांची व्यथा ही याहीपेक्षा भयंकर आहे. वर्षातून दोन पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पन्न तोकडेच होते. त्यात वन्य प्राण्यांचा त्रासामुळे शेतकरी पूर्ण हतबल झालेला असतो. हरणांचा कळप, रानडुकरांची गॅंग, माकड यांचाही त्रास खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्याला सोसावा लागतो. निसर्गाच्या अवकृपेला टक्कर देत खारपाण पट्ट्यातील शेतकरी वन्य प्राण्यांशी दोन हात करीत असतो.वन्यप्राण्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी खापरवाडी येथील शेतकरी जगन बगाडे यांनी कॅक्टर्स म्हणजेच निवडुंग प्रकारातील वनस्पतीचे जवळपास बावीस एकर शेतीला चारही बाजूंनी कुंपण केले. शेतातील कुंपण 12 फूट उंच व तीन फूट रुंद आहे. या कुंपणामुळे पिकांमध्ये वन्य प्राणी येत नाहीत. त्यामुळे पिकांचे संरक्षण होते. शिवाय लोखंडी कुंपणासाठी लागणाऱ्या खर्चातही बचत होते. हे कुंपण पूर्णता वनस्पतीवर आधारित असून आता अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये हा प्रयोग राबविण्यासाठी पुढे येत आहेत.वन्यप्राण्यांच्या त्रासापासून कृषी विभाग आणि वन विभागाच्या योजना ह्या असल्या तरी त्या शेतकऱ्यांसाठी लवकर मिळणाऱ्या नाहीत. अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करून वन्य प्राण्यांच्या नुकसानीचा मोबदलाही तोकडा वन विभागाकडून दिल्या जात असल्याचे उदाहरणे आहेत. तर यावर उपाय म्हणून अनेक तज्ञांनी प्रयोग केले. मात्र, ते यशस्वी झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, हे विशेष.
हेही वाचा - तब्बल पाच हजार पेक्षा जास्त प्रसुती करणारी सुईण!