अकोला - गेल्या दोन दिवसांपासून अकोल्यातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. तापमानाचा पारा ४६.४ अंशावर पोहोचला आहे. पहाटेपासून गरम हवा आणि कडक ऊन होते. त्यामुळे आजही अकोलेकरांनी घराबाहेर निघण्याचे टाळले. परंतु, चाकरमान्यांना ते शक्य न झाल्याने भर उन्हात ही ते काम करताना दिसून आले.
'हिट वेव्ह'चा अकोल्याला चांगलाच फटका बसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून अकोल्याचे तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी अकोला ४६ अंशाच्या पार पोहोचला. अचानकपणे तापमानात झालेल्या वाढीचा गेल्या तीन दिवसांपासून अकोलेकरांना चांगलाच फटका बसत आहे. हिट वेव्ह अजूनही चार दिवस राहणार असल्याचे समजते. तोपर्यंत यापासून अकोलेकरांना सुटका मिळणार नाही. दरम्यान, या कडक उन्हामुळे मैदानात खेळणारी लहान बालके आणि मुले हे सायंकाळ झाली तरीही खेळताना दिसत नाहीत.
तसेच, रोज सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिकही रस्त्यांवर दिसेनासे झाले आहेत. बाजारपेठाही ओस पडल्या आहेत. थंड लिंबू सरबत, शीतपेय, उसाचा रस, मठा, लस्सी यासारख्या पदार्थांची गरज भासत आहे. दुचाकीवर फिरणारे चालक कानाला दुपट्टा बांधून फिरताना दिसतात. या कडक उन्हामुळे शासकीय कार्यालयातही गर्दी कमी दिसून येत असून, अनेक कर्मचारी उन लागल्याच्या कारणाने कार्यालयात येत नसल्याचे समजते.