अकोला - भाजप सरकारने अफलातून निर्णय घेत नोटबंदी केली. नोटबंदी करून पंतप्रधानांनी काय तीर मारला, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. या नोटबंदीने देशाची आर्थिक स्थिती बिघडवली. रोजगार गेले, बेरोजगारी वाढल्याचे पवार म्हणाले. शेतकरी म्हणजे काय हे मुख्यमंत्र्यांना माहीतच नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
वाडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम गावंडे व काँग्रेसचे उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. राज्याच्या लोकांना परिवर्तन हवे आहे. बदल एकदम कोणी मागत नसतो. सैनिकांच्या हवाई दलाच्या हल्ल्याचा उपयोग मते मागण्यांसाठी कोणी केला नव्हता. सैन्याने दाखविलेल्या शौर्याचा उपयोग इंदिरा गांधी यांनी कधी केला नसल्याचे पवार म्हणाले. आज या देशाच्या यातना अधिक वाढल्या आहेत.
हेही वाचा - सरकारची दिवाळी भेट : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ
हेही वाचा - येत्या 5 वर्षात सर्व शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू - उद्धव ठाकरे
अभी तो मै जवान हूँ
मी अजूनही जवान आहे. भाजपच्या सरकारला घरी पाठवल्यानंतर मी जाणार आहे असे म्हणत 'मै सभी को घर भेजूंगा तब मै घर जावूंगा', असेही पवार म्हणाले. आम्ही एक नवी पिढीची फौज तयार करू, संघटना करून जातीयवादी ताकदीला हटवू, असेही पवार म्हणाले.
आमच्या सरकारने कर्जमाफी केली. त्यावर थांबलो नाही तर नवीन कर्ज देण्याचा निर्णय घेतला. रक्कम कसे द्यायचे याचे नियोजन केले. हा निर्णय आम्ही घेतल्याचे पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांबद्दल काही आस्था नाही. त्यांना शेतकरी काय हे माहीतच नसल्याचा आरोप त्यांनी केला.
हे सरकार शेतकऱ्यांना मदत करीत नाही. शेती मालाच्या किंमती वाढत नाहीत. सोयाबीन पीक चांगले आहे, पण शेंगामध्ये दाणा कमी असल्याने उत्पादन कमी होणार असल्याचे पवार म्हणाले. कापसाची सुद्धा हीच परिस्थिती असल्याचे पवार म्हणाले. सत्तेत आल्यावर कापसाला ७ हजार रुपयांचा दर देऊ असे म्हणाले होते. परंतू, त्यांनी या ५ वर्षात दिलेला शब्द पाळला नाही. आशांना घरचा रस्ता दाखविला पाहिजे. कर्जमाफी सरसकट करू, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. परंतू, 31 टक्के लोकांची कर्जमाफी झाली. ही घोषणा खरी ठरली नसल्याचे पवार म्हणाले.
कापडगिरण्या बंद झाल्या. कारखानदारी बंद झाली. कारखाने बंद केल्यामुळे रोजगार जात आहेत. नवीन कारखाने निघत नाहीत. जेट कंपनी बंद झाली. 20 हजार लोकांची नोकरी गेली. यामध्ये भाजप सरकारने लक्ष घातले नसल्याचा आरोपही पवार यांनी केला.