अकोला - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकमेकांना आव्हान करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर या २ दिग्गज नेत्यांकडून सत्य बाहेर आले पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
गोंदिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तर दुसरीकडे पवार यांनी दुसऱ्या दिवशी मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. आमची कळ काढली तर माफी नाही, असे शरद पवार म्हणाले होते. या २ नेत्यांनी एकमेकांना दिलेले चॅलेंज ते स्वीकारतात का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सर्वच गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच मोदी आणि पवार एकमेकांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ एप्रिलला गोंदियाच्या सभेत तिहार जेलचा उल्लेख केला. तिहार जेलमध्ये २ अत्यंत महत्त्वाचे कैदी आहेत. मुंबईच्या एकेकाळचा दाऊद इब्राहिम याचा साथीदार छोटा राजन तर दुसरा ऑगस्ट वेस्टलँड विमान घोटाळ्यातील महत्त्वाचा आरोपी. मोदी सभेत म्हणाले, की त्यांनी जर तोंड उघडले तर अनेकांचे खरे चेहरे बाहेर येतील. या आरोपांना शरद पवार यांनीही उत्तर दिले.
उस्मानाबाद लोकसभा प्रचाराच्या दरम्यान शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान केले, आमची कळ काढली तर, माफी नाही. देशात पहिल्यांदाच २ दिग्गज नेते एकमेकांना चॅलेंज देत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. लोकांसमोर खरी माहिती आली पाहिजे. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेले चॅलेंज मोदी स्वीकारतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यांनी हे चॅलेंज स्वीकारले तर नेमके काय बाहेर पडेल यांच्याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत, असे ते म्हणाले.
निवडणुकीच्या तोंडावर मोदी हे चॅलेंज स्वीकारतात का? हे पाहणे गरजेचे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला प्राचार्य धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, प्रदीप वानखडे, प्रा. प्रसन्नजीत गवई हे उपस्थित होते.