अकोला - देशभरामध्ये कोरोना रुग्णांसाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन अवैधरित्या अकोल्यात विक्री होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने आज तीन इंजेक्शन जप्त केले आहेत. हे इंजेक्शन प्रत्येकी 25 हजार रुपयांमध्ये विकले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अजूनही कारवाई सुरू असल्याने यासंदर्भात अधिक माहिती पोलिसांकडून मिळाली नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाच्यामार्फत तक्रार दाखल केल्यानंतर पुढील कारवाई पोलीस करणार आहेत.
अकोल्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने 75 हजार रुपयांचे तीन रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहे. यामध्ये पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. औषध विक्रीच्या दुकानांमध्ये खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. औषधी विक्रीचे व्यवसायिक यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. हे इंजेक्शन विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या चारपेक्षा जास्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत औषध विक्रेते आणि डॉक्टरांचा ही सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या टोळीने आणखी किती औषधे या आधी विकली याचाही तपास पोलीस करणार आहेत.
रेमडेसिवीर इंजेक्शन डॉक्टर रुग्णांना देताहेत. इंजेक्शन देताना शासनाच्या नियमाप्रमाणे दिले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे म्हणणे आहे. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने पंटरच्या माध्यमातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा अकोल्यात ही काळाबाजार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सध्या तपास सुरू आहे - पोलीस अधीक्षक जी. श्रीधर
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळे यांच्या पथकाने केली आहे. अजूनही ही कारवाई सुरू असल्याने याबाबत अधिक माहिती गुन्हा दाखल झाल्यानंतरच दिली जाईल. सध्या कारवाई सुरू सुरू आहे. हे इंजेक्शन विकणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली आहे.
या कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अकोला येथील सहायक आयुक्त यांनी अधिकृत बोलण्यास नकार दिला आहे. आमचे औषध निरीक्षक हे पोलिसांसोबत कारवाईसाठी गेले होते. मात्र, अजूनपर्यंत मला अधिकृत त्यांच्याकडून माहिती मिळाली नसल्याने त्याबाबत मी काहीच बोलू शकत नाही. अधिकृत माहिती मिळाल्यास आपणास माहिती दिल्या जाईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक सुलोचने यांनी सांगितले.