अकोला - अकोला जिल्हा अतिसंवेदनशील असल्याने असल्याने या जिल्ह्याला पोलीस आयुक्तालय व्हावे, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. या मागणीचा मागोवा घेत भविष्यात प्राधान्यक्रमाने अकोला येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ इतर ठिकाणचे आयुक्तालय उभारण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या दोन दिवस मुक्कामानिमित्त संदर्भात माहिती देत पालकमत्र्यांनी इतरही मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, अकोला जिल्ह्यातील अनेक कामे पूर्ण केली आहेत. या कामांमध्ये काही कामे सुरू असून ती पण लवकरच पूर्ण होणार आहेत. अकोल्याचा संवेदनशीलपना अजूनही कायम आहे. त्यामुळे अकोल्यातील पोलीस आयुक्तालयाची मागणी भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी शासन दरबारी केली आहे. या आयुक्तालयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व मंजुरी दिली आहे. तरीही काही अडचणी आहेत. पण, त्या तत्काळ पूर्ण करण्यात येतील. भविष्यामध्ये ज्या वेळेस पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्ताव मंजुरीसाठी येईल, त्यामध्ये अकोला पोलीस आयुक्तालय हे प्राधान्याने मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.