अकोला - होळी हा सण पुरणपोळी आणि रंगांसाठी ओळखला जातो. या दिवशी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र, या होळीत जळणाऱ्या पुरणपोळीने कोणत्याही गरजूचे पोट भरत नाही. ही पुरणपोळी गरजूंना मिळावी, यासाठी अभिनव सेवा समिती मागील वीस वर्षांपासून एक कौतुकास्पद उपक्रम राबवत आहे. गोरगरीब, कुष्टरोगी आणि परराज्यातून आलेल्या मोल मजुरांना या पुरणपोळीचे वाटप समितीच्यावतीने करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डाबकी रस्त्यावरील अभिनव सेवा समिती ही संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांच्या आदर्शावर काम करत आहे. होळी सणानिमित्त प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी बनते. नैवेद्याची एक पुरणपोळी होळीत न जाता ती गरजू आणि उपेक्षितांच्या पोटात जावी, यासाठी समितीने एक उपक्रम सुरू केला आहे.
हेही वाचा - इडापिडा टळो, कोरोना व्हायरस होळीत जळो'
होळीच्या दिवशी प्रत्येक घरातून एक पुरणपोळी जमा करुन त्या पुरणपोळ्या गरजू आणि उपेक्षितांना दिल्या जातात. आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात येऊन मोलमजुरीचे काम करणाऱ्या मजुरांनाही कुठला सण साजरा करता येत नाही. त्यांनाही होळीचा आनंद मिळावा यासाठी अभिनव सेवा समिती त्यांना पुरणपोळी, दूध आणि तुपाचे जेवण देऊन होळीच्या उत्साहात सहभागी करून घेतात.
अभिनव सेवा समितीचे संस्थापक वैद्य गणेश कावरे हे या उपक्रमाचे जनक आहेत. या उपक्रमासाठी त्यांना शहरातून पुरणपोळ्या स्वच्छेने दिल्या जातात. वीस वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम अव्याहत आणि निरंतर सुरूच राहील, असे वैद्य गणेश कावरे यांनी सांगितले.