अकोला - कोरोना महामारीच्या काळात कोविड आणि नॉन-कोविड रुग्णांची आर्थिक पिळवणूक न करण्याच्या सूचना शासनाने खासगी डॉक्टरांना दिल्या आहेत. परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष करीत अकोल्यातील आयकॉन रुग्णालयामध्ये 'पाच दिवसांचा अॅडव्हान्स भरल्याशिवाय रुग्णाला भरती करता येणार नाही', असा फलक लागला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाने सारवासारव केली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. रुग्णालयावर कारवाई करण्याचे संकेतही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या भीतीने खासगी रुग्णालयांमध्ये नॉन-कोविड रुग्णांची तपासणी जवळपास बंदच झाली होती. त्यामुळे अनेक रुग्णांचे हाल सुरू होते. अशावेळी सरकारने खासगी डॉक्टरांशी बोलून त्यांना प्रॅक्टिस करण्यास भाग पाडले. परंतु, यानंतर डॉक्टरांनी रुग्णांकडून जास्त शुल्क घेण्यास सुरुवात केली. त्यावर अंकुश बसवण्यासाठी जास्त शुल्क घेणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उचलण्याची भाषा सरकारने केली होती. तरीही अकोल्यातील खासगी आयकॉन रुग्णालयामध्ये लावलेल्या फलकाने रुग्णांची आर्थिक लूट सुरुच असल्याचे समोर आले आहे. आयकॉन रुग्णालयामध्ये 'पाच दिवसांचा अॅडव्हान्स भरल्याशिवाय रुग्णांना भरती करता येणार नाही, असे फलक लावले होते. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी या फलकावर आक्षेप घेतल्याने हॉस्पिटल प्रशासनाने तो फलक हटवले.
यासंदर्भात रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. के. अग्रवाल यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी या प्रकाराबाबत सारवासारव केली. रुग्ण पैसे भरत नसल्याने त्यांच्यासाठी ही सूचना म्हणून फलक लावले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयकॉन रुग्णालय कोणाचीही आर्थिक पिळवणूक करत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हा फलक आक्षेपार्ह आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये असे चालणार नाही. याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचित करण्यात आले असून यानंतर असा प्रकार पुन्हा होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.