अकोला - केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार हे आरक्षण विरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (सोमवार) अकोला येथे केला. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याबाबत अधिक बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी, 'आरक्षण पूर्णपणे संपवण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यांच्या धोरणामुळे 11 हजार ओबीसी विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.' असे म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर, प्रमोद वानखेडे यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे संचालन प्रा. प्रसन्नजित गवई यांनी केले.
हेही वाचा - एल्गार परिषद प्रकरण : नवलखांच्या जामीनाबाबत चौकशीचे अधिकार दिल्ली उच्च न्यायालयाला नाहीत - सर्वोच्च न्यायालय
वर्गामधला एक वर्ग आरक्षण विरोधी असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच ज्यांना ज्यांना आरक्षण मिळत आहे, त्या सर्वांना आरक्षणासाठी भांडावे लागत आहे. ओबीसी समाजाने अजून मुस्लिम धर्म स्विकारला नाही. ओबीसी हा हिंदूच आहे आणि केंद्रामध्ये सरकार ओबीसीचे आहे. राज्यातील काँग्रेस सरकार सॉफ्ट हिंदूवादी, राष्ट्रवादी काँग्रेस हिंदुत्व, तर शिवसेना हिंदूत्वचे प्रतिनिधी आहे. तरीही मुस्लिमांचे राज्य नसतानाही ओबीसीवरच अन्याय होतो आहे आणि हा अत्याचार हिंदू करत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.