अकोला - भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून राज्य सरकार आपला कार्यकाल पूर्ण करणार नसल्याचे वक्तव्य केले जात आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्राचे ज्योतिषी हे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना राज्यातील सरकार केव्हा पडेल, याबाबत तारीख, वेळ, महिना हे सगळं माहित असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज केली.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यातील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांची माणसे आहेत. तेच त्यांना सरकारबद्दल माहिती देतात. मी राज्य सरकारबद्दल काहीच सांगू शकत नसल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक आमदार, खासदाराला वाटते की आपण पाच वर्षांच्या आत घरी जाऊ नये. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेलच. पक्ष प्रमुख काहीही आदेश देत असतील, तरी सरकार हे आमदारच चालवतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यात बदलीवरून सध्या वाद झाला आहे. यावर त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ज्या पक्षाला असे वाटत असेल की आपला अपमान झाला आहे, त्यांनी ठरवायचे सरकारमध्ये राहायचे की नाही राहायचे. निर्लज्जपणे राहायचे असेल, तर राहतील. अपमान वाटत असेल, तर बाहेर पडतील. हा त्या त्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांनी कसा घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
चीन व भारत या दोन देशांमधील आज झालेल्या घटनेवर त्यांनी बोट ठेवले. ते म्हणाले, चीन बरोबर एक नाटक राहिले आहे. आज ते खरं झाले. सरकार म्हणते की चीन दोन किलोमीटर मागे गेला, आधी हे तर सांगा की तो किती आतमध्ये आला होता, असा प्रश्न त्यांनी केला. हा प्रकार पूर्णपणे फसवा आणि गुमराह करणारा आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.