अकोला - सत्ताधारी पक्ष असो वा विरोधक कोणीही बारा बलुतेदारांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. कोविडमुळे असलेल्या लॉकडाऊनमध्ये कुंभार व नाभिक समाजाच्या प्रश्नांसाठी वंचितला जोरदार लढा द्यावा लागला. तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली, आता मात्र मच्छीमारांचा प्रश्न बिकट झाला असून मच्छिमार, कोळी बांधव नसलेल्या बोगस सोसायट्यांना मच्छिमारी करण्याचे ठेके दिले जात आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे, परंपरागत मच्छीमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांना ठेका देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
राज्यात असलेले तलाव, बंधारा किंवा नदीकाठचा भाग हा ठेके पद्धतीने मच्छिमार बांधवांना मच्छीमारीसाठी दिला जातो. मात्र गेल्या काही वर्षात मच्छिमारी व्यवसायाशी ज्याचा काडीमात्र संबंध नाही, असे लोक बोगस सोसायट्या तयार करतात व प्रशासनाकडून मच्छीमारीचा ठेका घेतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने मच्छिमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांवर अन्याय होतो.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा बोगस लोकांचा ठेका बंद करून खऱ्या कोळी बांधवांना मच्छिमारी करण्यासाठी ठेके देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, कोळी बांधवांच्या प्रश्नांचा प्रशासन गांभीर्याने विचार करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्याची माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.