अकोला - जिल्ह्यातील लाभार्थींना पुरवठा करण्यासाठी भारतीय खाद्य निगमने पाण्याने भिजलेला, प्रमाणापेक्षा अधिक आद्रता असलेला तसेच खापरा किड लागलेल्या गव्हाचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे. तार फैल परिसरातील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात या गव्हाचा साठा केला जात आहे. यासंदर्भात नागपूर येथील एक पथक बुधवारी महामंडळाच्या गोदामाची पाहणी करण्यासाठी आले होते.
आधीच ३ कोटी २७ लाख रुपये किमतीचे धान्य खराब झाल्याचे प्रकरण या गोदामात घडले होते. तरीही हा खराब गहूही तेथेच साठवण्यात येत असल्याने खाद्य निगम वखार महामंडळाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण होत आहे.
धान्य लाभार्थींना गव्हाचा पुरवठा करण्यासाठी भारतीय खाद्य निगमने केंद्रीय वखार महामंडळाला काम दिले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यात पुरवठा होणारा गहू, तांदूळ वखाराच्या गोदामात साठवण्यात येणार आहे. भारतीय खाद्य निगमकडून अकोला जिल्हाधिकारी यांच्या नावे पुरवठा करण्यासाठी गोदामात धान्य देण्यास सुरुवात झाली आहे. या काळात आतापर्यंत ५० हजार क्विंटल गव्हाचा साठा झाला आहे. त्यामध्ये मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथील गोदामातून आलेला गहू पाण्याने भिजलेला, १७ टक्क्यांपेक्षा अधिक आद्रता असलेला तसेच धान्याची नासाडी करण्यात अग्रक्रमावर असलेल्या खापरा कीडग्रस्त आहे.
त्यामुळे हा गहू लाभार्थींना पुरवठा करण्यास योग्य नाही, असे वखारच्या गोदाम प्रशासनाच्या लक्षात येताच तेथे गोंधळ उडाला आहे. नमुन्यासाठी उघड केलेल्या पोत्यातील गहू अत्यंत खराब असल्याचे उघड झाले. त्यामुळे गोदाम व्यवस्थापनाने ही बाब भारतीय खाद्य निगमच्या मुंबईतील वरिष्ठांना कळविली. तसेच आता या गव्हाचा पुरवठा लाभार्थींना कसा करावा, अशी विचारणाही केली आहे.
खाद्य निगमकडून आलेल्या गव्हाची पडताळणी केल्यानंतर तो खराब असल्याचे पुढे आले. मात्र, खूप खराब असताना वखार महामंडळाने स्वीकारला कसा ? ही बाब आता केंद्रीय वखार महामंडळाच्या अंगलट येणार आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यास खराब गहू प्राप्त होण्याचे प्रकाराला भारतीय खाद्य निगम वखार महामंडळ की वाहतूक यंत्रणा जबाबदार आहे, हे पुढे येणार आहे. दरम्यान, यासंदर्भात केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम व्यवस्थापक, सुरेंद्र कुमार व टेक्निकल इनचार्ज यांच्याशी संपर्क साधला असता ते याबाबतीत काहीही बोलण्यास तयार नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.