अकोला - मूर्तिजापूर शहरात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यांना शहर पोलिसांनी धाड टाकून अटक केली. पोलिसांनी एक लाखाच्या मुद्देमालासह आठ आरोपी गजाआड केले आहे. शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्याजवळून 65 हजार रुपये किमतीचा पाच किलो गांजा आणि तीन मोबाईल असा एकूण 95 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. कपिल रतन शितोळे, अनुराग रमाकांत येदवर, सैयाद खान साहेब खान, बाळू लक्ष्मण शिंदे, गोलू ओमप्रकाश झरोडिया, सोनू काशीनाथ साखरे, संतोष बाबाराव तारेकर, मुरलीधर मोहनलाल व्यास याच्याविरुद्ध अवैध गांजा विक्रीवरून कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले व ठाणेदार शैलेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक इंगळे, महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गावळे कॉन्स्टेबल संजय भरसाकले, मनीष मालथाने, संतोष धारपवार, नागोराव भांगे, विष्णू ठोरे, स्वप्नील खडे, संजय लहाने यांनी केली.