अकोला - विशेष पोलीस पथकाने आज अवैधरित्या देशी दारूची विक्री करणारे आणि गावठी हातभट्टी चालवणाऱ्यांवर कारवाई केली. पथकाने दोन ठिकाणी छापा टाकून एक लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा - धावत्या ट्रेनमधून अभिनेत्रीचा मोबाइल पळवणाऱ्याला ठाणे पोलिसांकडून अटक
उमरीमधील महाकाली नगरात जगन्नाथ अमृतराव मदनकार आणि गोपाल जगन्नाथ मदनकार हे दोघे बाप-लेक अवैधरित्या देशी दारूची साठवणूक करून विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळाली. त्यांनी छापा टाकून 32 देशी दारूचे बॉक्स जप्त केले आहे. या बॉक्सची किंमत 90 हजार रुपये आहे. यामध्ये दोघांना अटक करून सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई गवळीपुरा येथील मनकर्णा प्लॉट येथे झाली. या ठिकाणी गावठी हातभट्टीतून दारू काढण्यात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने छापा टाकला. या छाप्यात मोहा सडवा नष्ट करण्यात आला. तसेच, तेथे असलेले साहित्यही नष्ट करण्यात आले. या सोबतच 43 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये मोहम्मद भिखारी कामनावाले, अफसर शाह सत्तार शाह या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच गोवंशाना दिले जीवदान
गवळीपुरा येथे शेख चंदू शेख लल्लू हा कत्तलीसाठी गोवंश घेवून आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळाली होती. त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून पाच गोवंशांना जीवदान दिले आहे.
हेही वाचा - नव्याने बांधलेल्या कोपरी ब्रिजच्या कामाविरोधात मनसेचे टाळ मृदुंग वाजवून आंदोलन