अकोला- लोहिया परिसरातील रुबी इमारतीच्या खाली एका प्लंबरची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. गणेश रामचंद्र काळे असे मृत प्लंबरचे नाव आहे.
हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींची घेणार भेट
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहिया कंपाऊंडमध्ये असलेल्या रुबी इमारतीच्या खाली गणेश याच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. गणेश जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून येथील चौकीदाराने याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गणेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विलास पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शैलेश सपकाळ यांनी भेट दिली. दरम्यान, गणेशला जखमी अवस्थेत पाहणाऱ्या चौकीदाराला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.