अकोला- शहरातील न्यू तापडीया नगर भागातील कुख्यात गुंड मोनू काकडची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निघृन हत्या केली. शुक्रवारी सकाळी न्यू तापडीया नगर भागातील एका निर्जन स्थळी त्याचा मृतदेह आढळून आला. हत्येची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
न्यू तापडिया नगर परिसरातील रहिवासी गजानन उर्फ मोनू काकड याच्यावर अज्ञात मारेकर्यांनी शुक्रवारी पहाटे धारदार शस्त्र व दगडाने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मोनू काकड हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, आपसी वैमानस्याहून ही हत्या झाली असावी, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना..
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांनी ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू..
याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृताच्या चेहऱ्यावर गंभीर घाव असून चेहरा दगडाने ठेचला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले असून मृतदेह शवविच्छेदनाठी पाठविला आहे.
हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमधील १२ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार