अकोला - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी खंडणी जमा करण्याचे आरोप लावले आहेत. याप्रकरणी आज अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चौकात येऊन निदर्शने केली. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
हेही वाचा - कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा धसका; सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयातच तपासणी सुरू
विरोधी पक्षनेत्यांवरही निशाणा -
अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या मागणीच्या टाकलेला लेटर बॉम्बमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अनिल देशमुख यांना नाहक त्रास देऊन त्यांचे राजकारण संपुष्टात आणण्याचा हा प्रकार आहे. यामुळे राज्याची प्रतिमा खराब करण्याचा घाट विरोधी पक्षनेते करीत असल्याचा आरोप अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचे समर्थन केले. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष युसूफ अली आणि प्रदेश प्रवक्ता राजेश बोचे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
हेही वाचा - महाराष्ट्रातील 10 धरणे धोकादायक, संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल.