अकोला - सध्या राज्यात बर्ड फ्ल्यूचे संकट घोंघावत आहे. अशातच बाळापूर तालुक्यातील वाडेगाव जवळ असलेल्या नकाशी येथील पानवठ्याजवळ 42 पक्षी मृत आढळल्याचे बुधवारी रात्री उघडकीस आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पक्ष्यांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेसाठी पाठविणार असल्याची माहिती उपयुक्त डॉ. तुषार बावणे यांनी दिली. तर बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे येथील शेतकऱ्याच्या घरगुती वागविलेल्या 70 कोंबड्या अज्ञात रोगामुळे मृत झाल्या आहेत.
सतर्कतेचे आदेश-
देशात कोरोनाचा हाहाकार उडालेला असताना बर्ड फ्ल्यूने डोके वर काढले आहे. राज्यात काही जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रकार समोर आला असताना अकोला जिल्ह्यात मात्र एकही घटना उघडकीस आली नाही. दरम्यान, काही ठिकाणी पक्षी मृत आढळून येत असल्याने जिल्हावासीयांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानी आणि मूर्तिजापूर येथे पक्षी मृत आढळून आल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात सर्वात पहिल्यांदा परभणी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ८ जिल्ह्यात या महामारीने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता अकोला जिल्ह्यातही बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.