अकोला- शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने अकोल्यातील शिवाजी पार्कमधील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला आमदार अमोल मिटकरी यांनी अभिवादन केले. शिवचरित्राचे वाचन करुन ते आत्मसात करणारा कुणीही व्यक्ती आयुष्यात अयशस्वी होऊ शकत नाही, असे मिटकरी म्हणाले. याप्रसंगी शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यात आले होते.
भारतीयांचा पहिला प्रेरणादायी स्वातंत्र्य दिन म्हणजेच 6 जून 1674 हा आहे. या दिवशी बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारतीयांच्या हृदयातील सिंहासनाधीश्वर झाले, असे मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. आज या घटनेला 346 वर्षे पूर्ण झाली आहेत. छत्रपती शिवरायांचे विचार आजही मनामनात अखंड प्रेरणेचा झरा म्हणून कायम आहेत, असे मिटकरी म्हणाले.
अकोल्यातील शिवाजी महाराज पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आमदार अमोल मिटकरी यांनी तुतारींच्या निनादात वंदन करीत पुष्पहार अर्पण केला. मी आयुष्यात नेहमीच शिवचरित्र व शंभूचरित्र यांची प्रेरणा घेऊन आजवर कार्य केले आणि त्याची पावती म्हणूनच मला विधान परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आमदारकी मिळाली. आयुष्यात शिवचरित्र, शंभूचरित्र आत्मसात करणारे इतिहास निर्माण करतात, असे प्रतिपादन आमदार मिटकरी यांनी केले.