अकोला - जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 50 बेड्सची तसेच महानगरपालिका क्षेत्रात 100 बेडची ज्यादा सुविधा निर्माण करा, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
पालकमंत्री बच्चू कडू हे सध्या स्वतः कोरोना बाधित आहेत. ते गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. असे असतानाही त्यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व व प्रमुख अधिकाऱ्यांची सोमवारी मोबाईल कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या यंत्रणेमार्फत ज्यादा 50 बेडची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. अकोला महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेतर्फे 100 बेडची जादा सुविधा उपलब्ध करण्यात यावी. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथील अतिदक्षता विभागातील बेडची संख्या ही वाढवण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले.
तसेच जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत उपचार सुविधांमध्ये कमतरता भासू न देण्याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. जिल्ह्यात मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे तसेच अन्य प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असेही निर्देशही त्यांनी यावेळी दिले.