अकोला - घरकाम करणाऱ्या अनेक महिलांचे कोरोना लॉकडाऊनमुळे रोजगार गेले. त्यामुळे रोजंदारीवर चालणाऱ्या त्यांच्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले. अशा गरजू महिलांना शहरातील ‘होप’ संस्थेने नवी दिशा मिळवून दिली आहे. त्यांनी या महिलांना शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले. सध्या या महिलांनी तयार केलेल्या मूर्तींना भक्तांकडून प्रचंड मागणी आहे.
मागील काही वर्षांपासून 'होप' ही संस्था महिला सक्षमीकरण क्षेत्रात कार्यरत आहेत. कोरोनामुळे त्यांच्या संस्थेशी संलग्न असणाऱ्या आणि घरकाम करणाऱ्या अनेक महिलांचे रोजगार गेले. अशा परिस्थितीत या महिलांना आर्थिक पाठबळ देणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे या दोन्हीचा मेळ साधून होप संस्थेने ‘घरोघरी शाडू मातीचा गणपती’ संकल्पना पुढे आणली. या अंतर्गत २५ गरजू महिलांचा एक गट तयार करण्यात आला. संस्थेतीलच सदस्यांनी त्यांना गणपती तयार करण्यासाठीचे प्रशिक्षण दिले. रंगकाम आणि मूर्ती घडवणे असे कामचे विभाजन करण्यात आले. त्यानंतर या महिलांनी गणेशमूर्ती घडवण्यास सुरुवात केली. गेल्या महिनाभरापासून या महिला गणेशमूर्ती तयार करत आहेत.
कौलखेड, जुने शहर, शिवसेना वसाहत भागात सध्या हे काम सुरू आहे. कोरोना नियमांचे पालन करून या महिला परिसरातील एका महिलेच्या घरी जाऊन दोन-दोन, तीन-तीनच्या समुहाने मूर्ती तयार करतात. त्यांना आवश्यक साहित्य संस्थेकडून पोहचवले जाते. विशेष म्हणजे, या मूर्तींना ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेकांनी आतापासूनच अॅडव्हान्स बुकिंग केली आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही मूर्ती तयार करुन देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे या महिलांच्या उत्साहात अधिकच भर पडली आहे. होप संस्थेमुळे कठीण परिस्थितीतही सन्मानाचे स्थान प्राप्त झाल्याचे त्या सांगतात.
या महिला तयार करत असलेल्या मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत. मूर्तींसाठी ग्रांधीग्राम येथून शेतातील माती आणण्यात आली आहे. तसेच रंगही नैसर्गिक वापरण्यात आले आहे. ८ इंच देत ३ फुटापर्यंतच्या शाडूच्या मूर्ती या महिलांनी घडवल्या आहेत. पाचशे मूर्ती घडवण्याचे लक्ष या महिलांनी ठेवले आहे.