अकोला - महाबीजने शेतकऱ्यांना यावर्षी दिलासा दिला आहे. महाबीजने आपल्या सोयाबीन बियाणांच्या दरात वाढ न करता बियाणांचे दर मागील वर्षीइतकेच कायम ठेवले आहेत. राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आहे त्याच दरात बियाणे उपलब्ध करून देण्याचे निर्देश महाबिजला दिले होते. त्यानुसार महाबीजने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी जाहीर केले दर -
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ दरवर्षी खरीप हंगामासाठी बियाण्यांचा सर्वाधिक पुरवठा करीत असते. राज्यात आगामी हंगामासाठी बियाण्यांचा पुरवठा हा सुरू होणार आहे. या वर्षीच्या बियाण्यांच्या दराकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. त्या दृष्टीने महाबीजने सोयाबीनसह इतरही बियाण्यांचे दर निश्चित केले आहेत. महाबीज यावर्षी सोयाबीन बियाणे दरात वाढ केली नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी महाबीजने निर्णय घेत या खरीप हंगामासाठी दर जाहीर केले आहेत.
दरवर्षी लाखो क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा महाबीज कडून केला जातो. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे बीजोत्पादन क्षेत्रात नुकसान झाले होते. त्याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे अपेक्षित सोयाबीन मिळू शकलेले नाही. या हंगामासाठी किती क्विंटल बियाणे महाबीज पुरवेल, या बाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. यंदा अधिक भार खासगी कंपन्यांच्या बियाण्यांवर राहणार आहे. महाबीजने दरवाढ न केल्याने बाजारपेठेत सोयाबीन बियाण्यांच्या दरावर आपोआप नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यात मध्यप्रदेशातील बियाणे कंपन्यांकडून पुरवठा केला जातो. बाजारपेठेत यंदा सोयाबीन चांगला भाव मिळालेला आहे.
राज्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र 42 लाख 22 हजार 165 हेक्टर आहे. त्यासाठी 31 लाख 66 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे. या सोयाबीन बियाण्याची कमी भासू नये, यासाठी राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना स्वतःकडील बियाणे वापरण्याबाबत आव्हान केले होते. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांकडे स्वतःकडून मोठ्या प्रमाणात बियाण्यांची नियोजन केले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार 20 लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे.
असे आहेत महाबीजच्या सोयाबीनचे यावर्षीचे दर -
- सोयाबीन जेएस 335 (30 किलो) - 2 हजार 250 रुपये
- सोयाबीन जेएस 9305, जेएस 9560 आणि एमएयुएसए 71 (30 किलो) - 2 हजार 340 रुपये
- सोयाबीन एमएयुएस 158 आणि डीएस 228 (30 किलो) - 2 हजार 460 रुपये