अकोला - देशातील बळीराजाला नव्या तंत्रज्ञानाची गरज आहे. हीच बाब ओळखून अकोल्यातील ग्रामीण आणि शेतकऱ्यांच्या मुलींनी पेरणी यंत्र तयार केले आहे. हे पेरणी यंत्र जगात प्रथम स्थानी ठरले आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांनी या यंत्राच्या माध्यमातून पेरणीही केली आहे.
कोणत्याही प्रकारचे पीक घेण्यासाठी पेरणीयंत्र फायदेशीर -
शेतकऱ्याला परवडेल असे तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे, किंबहुना ते होतही आहे. असेच संशोधन येथील मनुताई कन्या शाळेत दहावीत शिकणाऱ्या आणि ग्रामीण भागातील मुलींनी पेरणी यंत्र तयार केले आहे. एकच व्यक्ती हे यंत्र चालू शकतो. त्यासाठी त्या शेतकऱ्याला जास्त श्रमही लागणार नाही. कमी वेळेत आणि कोणत्याही प्रकारचे पीक घेण्यासाठी हे पेरणी यंत्र फायदेशीर ठरते आहे.

बैलजोडी आणि ट्रॅक्टरची गरज नाही -
रिधोरा, सोमठाणा, भोड, खडकी, खडकी टाकळी, भौरद, अकोली खुर्द, अकोली बुद्रुक यासह आदी गावातील शेतकऱ्यांनी हे पेरणी यंत्र वापरले आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांना शारीरिक त्रास आणि मजूर न मिळण्याची कटकट राहिली नाही. विशेष म्हणजे, पेरणी करताना शेतकऱ्यांना बियाणे व्यवस्थित आणि बरोबर अंतरावर पडले पाहिजे, याची चिंता होती. परंतु, या यंत्रामुळे शेतकऱ्यांना कुठलीच काळजी घ्यावी लागत नाही. किती बी पडले हे या यंत्रातून कळते. तसेच या यंत्रामुळे बैलजोडी आणि ट्रॅक्टरची गरज शेतकऱ्यांना लागत नाही आहे.

मुलींनी घेतले रोबोटिक्सचे अद्यावत प्रशिक्षण -
केआयटीएस या रोबोटिक्सचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या प्रमुख काजल राजवैद्य यांच्या कुशल नेतृत्वात व विजय भट्टड यांच्या मार्गदर्शनात मुलींनी रोबोटिक्सचे अद्यावत प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून मुलींनी पेरणी यंत्र तयार केले. या यंत्राचे प्रात्यक्षिक, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया, पेरणी यंत्र कशा प्रकारे काम करते, याची संपूर्ण माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांना दिली.

जगभरात या मुलीचे कौतूक -
'फर्स्ट' या संस्थेने आयोजित केलेल्या 'फर्स्ट' रोबोटिक्स स्पर्धेमध्ये या मुलींची एकच चमू निवडल्या गेली होती. अंतिम फेरीमध्ये 11 देशांमधून तीन हजार चमूंपैकी उत्कृष्ट 20 चमुंचे अविष्कार निवडले गेले होते. 28 आणि 29 जूनला ही ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली. ज्यामध्ये या मुलींनी बनविलेल्या पेरणी यंत्राला नावीन्यपूर्ण प्रभावशाली प्रोजेक्ट अवार्ड मिळाला आहे. त्यामुळे जगभरात महानगरातील या मुलीचे कौतूक होत आहे.

ही आहे चमू -
हे यंत्र तयार करणाऱ्या चमूमध्ये गायत्री तावरे, स्नेहल गवई, अंकिता वाजिरे, अर्पिता लंगोटे, निकिता वसतकर, रुचिका मुंडाले, सायली वाकोडे, प्रणाली इंगळे, गौरी गायकवाड, नेहा कवळकार, पूजा फुरसुले, स्वाती सरदार, सानिका काळे, आचल दाभाडे, दिया दाभाडे, गौरी झांबरे, प्रांजली सदाशिव, यांच्यासह तंत्र सहाय्यक ऋषभ राजवैद्य यांचा समावेश आहे.
हेही वाचा - मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय - राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया