अकोला - शहर अमली पदार्थांचे माहेर घर बनत असल्याचे अलीकडच्या दिवसांत समोर येत आहे. वारंवार पोलिसांकडून वाढलेल्या कारवाईवरुन शहरात हे सिद्ध होत आहे. पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने शहरात बऱ्याच वेळा अमली पदार्थ गांजा पकडला आहे. त्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री 500 ग्रॅम ब्राऊन शुगर अकोट फाइल येथील पुरपीडित कॉलनीत पकडली आहे. या ब्राऊन शुगरची किंमत साडेसात लाख रुपये असून, एक मोबाइलही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, ज्याच्याकडे ही ब्राऊन शुगर मिळून आली अफजल खान खलील खान यास पोलिसांनी अटक केली आहे.
एकाला अटक
चित्रपटसृष्टीमध्ये अंमली पदार्थांच्या कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच अकोल्यामध्ये ही अमली पदार्थ विकले जात असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईवरून समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महाले यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी अकोट फाइल येथील पूर पीडित कॉलनीमध्ये अफजलखान खलील खान याच्या घरी छापा टाकला.
सात लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
या छाप्यामध्ये पथकाने 500 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली. तसेच, अफझलखान यास अटकही केली. त्याच्याकडून एक मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सात लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ ब्राऊनशुगर मिळून येण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईबाबत मात्र पोलिसांनी गुप्तता पाळली होती.
हेही वाचा - आर्यनला भेटण्यासाठी शाहरूख खान कारागृहात दाखल