अकोला - अनभोरा रस्त्यावर शुक्रवारी रात्री पिकअप बुलेरो गाडीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या २ जणांना विशेष पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये चालक ऐफाज खान एजाज खान आणि क्लिनर अमिनउल्ला खान शमीउल्ला खान याचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून एकूण १८ लाखांचा गुटखा जप्त केला.
पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर हे पथकासह रात्री गस्तीवर होते. अनभोरा रस्त्यावर पिकअप बुलेरो गाडी (एमएच २७ बी एक्स ००८३) या गाडीवर संशय आल्याने तिची तपासणी केली. यावेळी त्यांना महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची २७ पोती सापडली. याची एकूण किंमत १८ लाख ९० हजार असून गाडीची किंमत ६ लाख रुपये आहे. पोलिसांनी एकूण २४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हे प्रकरण मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. हा गुटखा बडनेरा येथील जावेद नावाच्या व्यक्तीचा असून तो अकोल्यातील अमोल नावाच्या व्यक्तीकडे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.