अकोला - हैदराबाद येथील पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपींचा केलेला एन्काऊंटर निषेधार्ह आहे. अशाप्रकारे, जर पोलीसच न्याय करायला लागले तर न्यायव्यवस्था संपेल, अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - हैदराबादमध्ये झाला, तसा न्याय माझ्या मुलीलाही द्या, उन्नाव पीडितेच्या वडिलांची सरकारकडे मागणी
हैदराबाद येथील पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटेनीतील आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात सादर करणे क्रमप्राप्त होते. मात्र, पोलिसांनी या चारही आरोपींना कोठडीमध्ये असताना त्यांचा एन्काऊंटर केला. अशाप्रकारे आरोपींना मारण्याचा हा प्रकार निंदनीय आहे.
या प्रकारामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडणार असून अराजकता पसरण्यास मदत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर पोलीसच न्याय करायला लागले तर न्यायव्यवस्थेवर विश्वास कोण करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या पोलिसाला पैसे देऊन कुणाची सुपारी देऊन त्याला संपविण्याचा प्रकार भविष्यात होऊ नये, याचा विचार व्यवस्थेने केला पाहिजे, असेही ते म्हणाले.