अकोला - कोविड रुग्णालय म्हणून कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना अनियमितता असल्याने व शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न केल्याबद्दल अकोला येथील सहा रुग्णालय चालकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. एका रुग्णालयाने रुग्णास जादा शुल्क आकारले म्हणून आकारलेले जादा शुल्क परत करण्याचे आदेश दिले आहेत.
येथील सिटी हॉस्पिटल, रामदास पेठ, आधार हॉस्पिटल नवीन बसस्टॅण्ड जवळ हार्मोनी हॉस्पिटल, माऊंट कारमेल शाळेजवळ, श्री गणेश हॉस्पिटल, रतनलाल प्लॉट चौक, डॉ. भिसे यांचा दवाखाना, जयहिंद चौक व बिहाडे हॉस्पिटल या ठिकाणी कोविड रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या समितीने पाहणी व चौकशी केली.
- समितीला या अनियमितता दिसून आल्या
- आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट उशीराने झाल्या, काही अहवाल प्रलंबित असणे,
- चाचण्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तसेच अहवाल जिल्हा प्रशासनास न कळविणे
- कोविड चाचणी निगेटीव्ह व एचआरसीटी स्कोअर जादा असतांना शासनाच्या रुग्णालयात वा कोविड रुग्णालयात संदर्भित करण्याऐवजी नातेवाईकांच्या संमतिशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करणे
- शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सुचनांप्रमाणे डीसीएच किंवा डिसीएचसी ला तात्काळ संदर्भित न करणे
- बिहाडे हॉस्पिटल येथे एका रुग्णास जादा शुल्क आकारणी केल्याचेही चौकशीत आढळल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे.
- महापालिकेने केली होती तीन रुग्णालयावर कारवाई
अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये तीन खासगी रुग्णालयांनी परवानगी न घेता कोरोनाग्रस्तांवर रुग्णांवर उपचार करत असल्याने 17 एप्रिल रोजी महापालिका आयुक्त यांच्या आदेशान्वये त्यांच्यावर 10 लक्ष रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - प्रकाश आंबेडकरांचा अकोला महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांवर घणाघात