अकोला - मान्सूनला सुरूवात होत आहे. जिल्ह्यातही शुक्रवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात एका रात्रीत ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस सुरू असताना लाईट वारंवार ये-जा करत होती. त्यामुळे महावितरणच्या पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मागील आठ दिवसांपासून ४५ अंशाच्यावर असलेल्या अकोल्याच्या तापमानात शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसामुळे घट झाली. वातावरणामध्ये शुक्रवारी सायंकाळपासूनच बदल झाला होता. त्यानंतर रात्री विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याला सुरूवात होऊन रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. १ ते २ तास पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यानच्या काळात विजेचा लपंडाव सुरू असल्याने संपूर्ण शहर अंधारात होते.
जोरदार वाऱ्यामुळे कुठेही नुकसान झाल्याची माहिती आपत्ती विभागाकडून मिळाली नसून वीज पडल्यामुळे ही कुठेही अपघात झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाच्या हजेरीमुळे कृषी केंद्रावर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, पेरणीसाठी आणखी पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.