अकोला - जिल्ह्यात रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर बाळापूर तालुक्यातील मोरगाव भाकरे येथे गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काढणीला आलेल्या कांद्यालाही फटका बसण्याची शक्यता आहे. 45 अंश जवळ पोहोचलेल्या कडक उन्हाच्या वातावरणात पडलेल्या पावसामुळे थंडावा निर्माण झाला होता.
अकोल्यात सध्या कडक ऊन असून दररोज तापमान हे 45 अंशाच्या जवळपास असते. त्यामध्ये कुठलीही घट झालेली नाही. अशा परिस्थितीत शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. या पावसाचा सर्वात जास्त फटका काढणीला आलेल्या कांद्याला त्यासोबतच टरबूज व खरबूजसह इतर फळपिकांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संचारबंदीमुळे शेतकर्यांचे आधीच आर्थिक नुकसान होत आहे. त्यात हा अवकाळी पाऊस जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
बाळापूर तालुक्यातील मोरगाव भाकरे येथे पावसासह गारांचा वर्षाव झाला. गारांचा आकार लिंबू एवढा होता. या गारांमुळे कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. परंतु, परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.