अकोला - दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी (दि. 3 फेब्रु.) दिवसभर शाळा, महाविद्यालय परिसरात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांवर कारवाई केली. तब्बल आठ ठिकाणी केलेल्या कारवाईत दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरातील पानटपरी चालकांकडून प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शहरातील विविध ठिकाणी तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात असलेल्या पानटपऱ्यांची तपासणी केली. बऱ्याच पान टपरी चालकांकडे प्रतिबंधित गुटखा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू विकले जात असल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर एटीसीने या सर्वांकडे छापेमारी केली. त्यामध्ये आठ जणांकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.
यांच्यावर झाली कारवाई
सौरभ राजेन्द्र वर्मा, ओमप्रकाश घुलचंद मेहता, ब्रिजपालसिंग लालसिंग ठाकुर, सतीश खेरा मिश्रा, उमेष जमनाप्रसाद सोनार, नितेश लक्ष्मण कनोजिया, अरुण माधोजी काम्बले, सुशील घनश्याम तिवारी या पान टपरी चालकाकडे विनापरवाना अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विकल्यावरून कारवाई करण्यात आली.
गुटखा माफिया मोकाट
दहशतवाद विरोधी पथकाने शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात पान टपरी चालकांवर कारवाई केली असली तरी जे शहरातील पान टपरी चालकांकडे गुटखा पुरवतात ते गुटखा माफिया अजूनही मोकाट आहेत. गुटखा माफियांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा - शर्जील यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; रामनवमी शोभायात्रा समितीची मागणी