अकोला- पाऊस कमी पडत असल्यामुळे अकोला जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या सोमवारी झालेल्या जनता दरबारात अनेक शेतकऱ्यांच्या या संदर्भात तक्रारी होत्या. त्यामुळे पालकमंत्री डॉ. पाटील यांनी आज(मंगळवारी) कौलखेड जहांगीर, जांभा, पळसो बढे या गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जात भेट घेतली. शेतातील पीक परिस्थितीची पाहणी करीत, मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत माहिती देणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
जिल्ह्यात पावसाच्या अवकृपेमुळे कापूस, सोयाबीन पीक उगवणीच झाली नसल्याची परिस्थिती आहे. हा प्रकार बहुतांश गावात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसापेक्षा शासनाकडे मदतीच्या आशेने बघत आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीत शेती संदर्भात शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. तक्रारींचा पाऊस पाहता पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतीची पाहणी केली, पीक परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना धीर देत महिला शेतमजूर यांच्याशीही संपर्क साधला.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी व इतर अधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते. जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेऊन कृषिमंत्री व मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. तसेच महिला शेतमजुरांना विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना त्यांच्यासाठी शिबीर घ्यावे, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिल्या.