अकोला - जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. अकोट, अकोला, बाळापूर, पातूर, तेल्हारा, मुर्तीजापुर, बार्शिटाकळी या सातही तालुक्यांच्या तहसील कार्यालयांमध्ये व काही गोदामांमध्ये मतमोजणी होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत दहा ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या होत्या. मतमोजणी पाहण्यासाठी व निकाल ऐकण्यासाठी ग्रामस्थांची मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी झाली आहे. मतमोजणीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
4 हजार 411 उमेदवारांचे ठरणार भवितव्य -
अकोला जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायत निवडणूक15 जानेवारी रोजी झाली होती. 4 हजार 411 उमेदवार या निवडणूक रिंगणात उभे होते. 4 लाख 63 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव वगळता इतर कुठेही निवडणूक मतदाना दरम्यान अनुचित प्रकार घडला नाही. अकोलासह इतर सहा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी तहसील कार्यालये आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात सुरू झाली आहे. अद्यापपर्यंत कुठल्याही ग्रामपंचायतचा निकाल बाहेर आला नाही. मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे. अकोला तालुक्यातील मतमोजणीला जिल्हाधिकारी कार्यालयातील सरकारी गोदामात सुरुवात झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली ही मतमोजणी होत आहे.