अकोला - घरगुती गॅसचा वापर ऑटोमध्ये भरण्याचा गोरखधंदा करणाऱ्या अड्ड्यावर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीसी) मंगळवारी (दि. 2 फेब्रु) दुपारी वाशिम बायपास येथे कारवाई करत चार सिलिंडर, तीन रिक्षा, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन व वजन काटा यासह चौघांना अटक केली आहे. त्यांच्यावर जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीवरून पथकाने वाशिम बायपास परिसरात शफिक खान जमीलखान याच्या घरात छापा टाकला. यावेळी तीन रिक्षामध्ये घरगुती गॅस भरताना आढळून आले. या प्रकरणी शकीलखान जमीलखान, शेख इमरान शेख यावर, मुजम्मिल कुरेशी महबूब भाई, इकराण हुसेन इकबाल हुसेन यांच्याविरुद्ध जीवनावशयक अधिनियम कलम 3 व 7 अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आलेली आहे.
तीन लाख 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
घटनास्थळावरून तीन रिक्षा (एम एच 30 ए ए 6265, एम एच 30 ए ए 7320, एम एच 30 ए ए 5424), चार गॅस सिलिंडर, तीन गॅस भरण्याची मशीन, एक इलेक्ट्रिक वजन काटा, एक मोबाइल, असा एकूण तीन लाख 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळी जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - अकोला जिल्हा दोन खुनांच्या घटनांनी हादरला