अकोला - विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू असतानाच, राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले होते. या पावसामुळे खरिपाच्या सर्व पिकांचे नुकसान झाले. राजकारण्यांना मात्र पिकांची पाहणी करण्यासाठी आता वेळ मिळत आहे.
परतीच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अकोला दौऱ्यावर होते. पिकांच्या पाहणीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सरकार स्थापनेच्या संदर्भात उत्तर दिले.
सध्याचे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. काळजीवाहू सरकारला निर्णय घेताना काही बंधने आहेत. तरीही, नियमांच्या सोबत राहून हे सरकार काम करीत आहे. महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन लवकरच सरकार स्थापन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शेतकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी सत्तास्थापनेचा तिढा सोडवून, लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : भाजपची भूमिका सध्या 'वेट अँड वॉच' - गिरीश महाजन