अकोला - शेजारच्या दोन मुलांच्या भांडणात झालेल्या अदखलपात्र गुन्ह्यात बोरगाव मंजू पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोप असलेल्या मुलास रविवारी ठाण्यात बोलाविले. मुलगा ठाण्यात जात असल्याने वडीलही त्याच्या पाठोपाठ गेले. पोलीस कर्मचारी मुलास मारत असल्याचे पाहून वडिलांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकारामुळे नातेवाईकांनी मृतदेह सोमवारी ठाण्यात आणला. त्यामुळे तिथे तनाव निर्माण झाला. दरम्यान, या प्रकरणी ठाणेदार सुनील सोळंके यांनी तक्रार घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला आहे. शिवाजी सातव असे मृत वडीलाचे नाव आहे.
बोरगाव मंजू येथील भवानी पुरामधील गणेश सातव व सतिश महाजन या दोघात शुल्लक कारणावरून रविवारी वाद झाला होता. सतिश महाजन याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अदखलपात्र नोंद करून गणेश सातव यास ठाण्यात बोलावले. आपल्या मुलाला पोलिसांनी बोलावले म्हणून वडील शिवाजी सातव हे सुद्धा पोलीस ठाण्यात हजर झाले.
एका पोलीस कर्मचाऱ्याने अदखलपात्र नोंद असतांना गणेश सातव यास वडीलासमक्ष थापड मारली. कधीही उभ्या आयुष्यात पोलीस ठाण्याची पायरी न ओलांडलेल्या शिवाजी सातव यांना आपल्या मुलास एका पोलिसाने थापड मारली हे असह्य झाल्याने त्यांची प्रकृती अचानक पोलीस ठाण्यातच खराब झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळेच वडिलांवर ही वेळ आली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणला.
या घटनेची दखल घेऊन ठाणेदार सुनील सोळंके यांनी नातेवाइकांची समजुत काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची तक्रार गणेश सातव यांनी बोरगाव मंजू ठाण्यात दिली. पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली. पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके करत आहेत.
हेही वाचा - उत्तर प्रदेशचे 'स्पेशल १००' पोलीस पंजाबला पोहोचले; मुख्तार अन्सारीला आणणार परत