अकोला - पीक विम्याचे पैसे बँक खात्याचा क्रमांक चुकीचा असल्यामुळे परत गेले. त्यामुळे ते मिळवण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी विमा कंपनीचे अधिकारी, कृषी अधीक्षक आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या समक्ष शेतकऱ्यांना विम्याचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तोडगा काढण्यात आला.
शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी पीक विमा काढला होता. त्यांचा पीक विमा मंजूर देखील झाला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांकडे बँक खात्याचे क्रमांक देखील दिले. मात्र, खाते क्रमांक चुकीचे असल्याने त्यांचे पैसे परत पाठवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळाले नाही. थकीत पीकविम्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी लोणकर यांची भेट घेतली. यावेळी कृषी अधीक्षक वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी श्याम चिवडकर, व्यवस्थापक मानकर यावेळी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि इतर बँकेचे शेतकरी, असे एकूण 900 शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम परत गेली. त्या शेतकऱ्यांची यादी काढण्याच्या सूचना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ही यादी आल्यानंतर ती कृषी अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे संबधित शेतकऱ्यांना भेटणार आहेत. तसेच बँक खात्याचा क्रमांक व्यवस्थित करून त्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.