अकोला - कांद्याचे भाव गगनाला भिडलेले आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे कांदा साठवणूक करणाऱ्या व्यावसायिकांवर आता जिल्हा पुरवठा विभागाची नजर राहणार आहे. तसे आदेश सरकारने काढले असून या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे कांदा साठवणूक करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
सध्या देशभरामध्ये कांद्याचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी गुरुवारीच तसे आदेश पारित केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा पुरवठा अधिकारी करणार असून उद्यापासून शहरातील गोदामांची तपासणी होण्याची शक्यता आहे. शहरात 22 गोदाम असल्याचे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अहवालावरून जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी सांगितले.
कांद्याच्या साठवणुकीवर सरकारने निर्बंध घातले आहेत. घाऊक व्यापाऱ्यांना 50 मेट्रिक टन अर्थात 500 क्विंटल, तर किरकोळ व्यापाऱ्यांना 10 मेट्रीक टन अर्थात 100 क्विंटल पर्यंतचा साठा करण्याची मुभा आहे. त्यापेक्षा जास्त कांदा आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. कांदा साठवणुकीचा प्रकार सरकराने ईसी अॅक्टमध्ये समाविष्ट केल्यामुळे आता बेकायदा साठवणूक करणाऱ्या कांदा व्यावसायिकांवर गुन्हे दाखल होण्याचे संकेतही जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांनी दिले.