अकोला - श्रावण महिन्याच्या चौथ्या श्रावण सोमवारी अकोला शहर जय भोले स्वाध्याय झाला. पहाटेपासून सुरू झालेल्या कावड उत्सवाला शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'हर हर महादेव'चा नारा देत हे कावडधारी अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात कावड घेऊन पोहोचत आहेत. राजेश्वराला जलाभिषेक करून या कावड यात्रेची सांगता केली जाते.
गांधीग्राम येथून आलेल्या कावडधारींनी शहराच्या वेशीवर प्रवेश करताच मानाची पालखी राजराजेश्वर मंदिराला प्रथम स्थान देत तिच्या पाठोपाठ इतर मानाच्या पालख्या उभ्या राहिल्या. त्यानंतर कावडधारी कावड घेऊन त्या पालख्यांच्या मागे उभे राहिले आहेत. हजारो युवक विविध मंडळांचे टी-शर्ट घालून आपापल्या पालखी व कावडसमोर उभे आहेत. ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर हे युवक पालखीसमोर व कावड समोर ठेका धरत आहे.
रात्रभर अनवाणी पायी आलेल्या कावडधाऱ्यांना खराब रस्त्यामुळे त्रास झाला आहे. ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनांनी खाद्यपदार्थ आणि चहाचे स्टॉल लावून ये-जा करणाऱ्या शिवभक्तांना आग्रहाने प्रसाद घेण्याचे निमंत्रण देत आहेत. तसेच सुरक्षेसाठी अकोल्यातीलच नव्हे तर वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.