अकोला - 60 वर्षे वयोगटातील जेष्ठ नागरिकांना आज जिल्ह्यातील आठ लसीकरण केंद्रांवर कोरोना लस देण्यात येत आहे. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष नोंदणी करून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सकाळपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील कोविड - १९ वॉरियर्सचेही लसीकरण या ठिकाणी सुरू आहे. दुपारपर्यंत 50 जेष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांनी दिली. कुठल्याही जेष्ठ नागरिकाला आतापर्यंत लसीकरणानंतर त्रास झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंधन दरवाढ विरोधात आंदोलन
कुठलाही त्रास झाला नसल्याची माहिती
जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना वॉरियर्सचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला जिल्हा स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महापालिकेने ठरवून दिलेल्या रुग्णालयात सकाळपासून सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत पन्नास जणांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती आहे. ज्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले, त्यांना कुठलाही त्रास झाला नसल्याची माहिती आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने लसीकरणासाठी नोंदणी
ऑनलाईन पद्धतीने लसीकरणासाठी नोंदणी आज सकाळपासून सुरू झाली. त्यासोबतच प्रत्यक्षरित्याही नागरिक लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर येत आहेत. जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची नोंदणी ॲपवर दोन दिवस आधीपासून झाली नव्हती. दरम्यान, सकाळपासून हे ॲप व्यवस्थितरित्या सुरू असल्याची माहिती आहे. अद्यापपर्यंत कुठल्याही व्यक्तीच्या लसीकरणाच्या नोंदणी संदर्भातील तक्रार आली नसल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली.
शासकीय लसीकरण केंद्रावरच लसीकरणाचे काम सुरू
शासकीय लसीकरण केंद्रावरच लसीकरणाचे काम सुरू आहे. खासगी रुग्णालयांवर लसीकरण करण्यात येत नसल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली. लसीकरण हे शासनाच्या नियमांनुसार करण्यात येत असून, सायंकाळपर्यंत 100 पेक्षा जास्त जणांना लसीकरण करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - अकोला, अकोट, मूर्तिजापूर शहरात आठ मार्चपर्यंत वाढवली संचारबंदी