अकोला - जनता बाजार मधील भाजी अडत दुकानदारांना आणि ठोक भाजीपाला व्यवसायिकांना पुन्हा जनता बाजारात आपला व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, याकरिता व्यवसायिकांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने अडते दुकानदार आणि ठोक भाजी विक्रेत्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित केले होते.
सहकारी तत्वावर सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजाराची निर्मिती-
जनता भाजी बाजारामध्ये अनेक वर्षांपासून भाजीपाला अडते आणि ठोक भाजीपाला विक्रेते व्यवसाय करीत आहेत. परंतु, अनेक वर्षांपासून महानगरपालिका प्रशासनाद्वारे ठोक भाजीपाला विक्रेते आणि भाजीपाला अडत दुकानदारांनी आपला व्यवसाय दुसरीकडे स्थलांतरित करण्याबाबत प्रयत्न सुरू होता. भाजीपाला विक्रेता आणि भाजीपाला दुकानदार यांनी सहकारी तत्वावर सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजाराची निर्मिती केली. या संस्थेचे बांधकाम सुरू असताना कोरोना महामारी सुरू झाली. यावेळी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने जनता बाजारातून भाजीपाला अडते दुकानदार आणि ठोक भाजीपाला विक्रेत्यांना सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजीपाला बाजार लोणी येथे स्थलांतरित केले होते. तेव्हापासून या ठिकाणी ते येथे व्यवसाय करीत आहेत.
साखळी उपोषण सुरू-
काही अडत दुकानदार हे विना परवानगी भाजीभाजीपाला विक्रीच्या नावाने व्यवसाय करीत आहे. याबाबत जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला अडते दुकानदार आणि ठोक भाजी विक्रेत्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. यामध्ये राजेश डाहे, संतोष अंबरते, अनंत चिंचोळकर, गणेश घोसे, अमोल गोलाईत यांचा सहभाग आहे.
हेही वाचा- अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी