अकोला - येथील जुना कपडा बाजारमध्ये निर्मल स्वीट मार्टची इमारत कोसळली. बुधवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. या इमारतीजवळ खोदकाम सुरु असल्यामुळे ती कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. इमारत कोसळली त्यावेळी इमारतीमध्ये कोणीही नव्हते. यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जुना कपडा बाजारातील निर्मल स्वीटमार्ट इमारतीला लागून खोदकाम सुरू होते. त्यामुळे ही इमारत क्षतिग्रस्त झाली होती. इमारतीचे मालक धर्मेश खिलोसिया त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. इमारतीमधील माती खाली पडत असल्याने त्यांनी तत्काळ स्वीट मार्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. कर्मचारी इमारतीच्या बाहेर निघताच ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. 3 मजली असलेली ही इमारत फार जुनी होती. इमारतीमध्ये 4 ते 5 सिलेंडर होते.
हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: महामार्गावर चालणारे मातीचे टिप्पर तत्काळ बंद
घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे कर्मचारी, महापालिकेचे उपायुक्त आणि क्षेत्रीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच इमारतीचा संपूर्ण पडलेला भाग काढण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी विजेचा प्रवाह खंडित करण्यात आल्यामुळे क्षतीग्रस्त इमारतीचा मलबा उचलण्यात अडचणी येत आहेत. यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी स्वप्निल सिंदखेडकर, शेख राजीक, गोपाल इंगळे, दिनेश ठाकूर, इलामे, काकडे, हर्षवाल, इश्वरसिंग ठाकूर हे परिश्रम घेत आहेत.