अकोला - वंचित बहुजन आघाडीच्या 'होमपीच'वर भाजपच्या उमेदवारासाठी ११ एप्रिलला मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ ही प्रचार सभा होणार आहे.
अकोल्यातील निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार यांच्या प्रचाराची धामधूम वाढत असताना भाजपची टीमही प्रचारासाठी जोमाने तयारीला लागली आहे. एकतर्फी निवडणूक होणार असल्याची चर्चा असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपची पहिली मोठी सभा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. विशेष म्हणजे, ही सभा वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांच्या परिसरात होत आहे.
वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसचे मतदार या ठिकाणी हजारोंच्या संख्येत असल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी ही सभा घेण्यात आली असल्याचे समजते. या सभेला १० ते १२ हजारांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार आहे, असे पक्षांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या सभेत मुख्यमंत्री फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भर उन्हात होणार सभा
अकोल्यातील तापमान ४३ ते ४४ अंशापर्यंत पोहोचले आहे. कडक उन्हात नागरिक घराच्या बाहेर निघत नसल्याने या सभेला हजारोंच्या संख्येने लोक येतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सभेसाठी क्रीडांगणाची साफसफाई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाची साफसफाई करण्यात येत आहे. मैदान परिसरातील झाडे तोडण्यात आली असून मैदानातील काचांचे तुकडे मात्र, तसेच आहेत. त्यामुळे सभेला येणाऱ्यांच्या पायात काच, दगड आणि काटे रुतण्याची शक्यता असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे.