अकोला - देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु, येत्या दोन महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहेत. जर त्रिसूत्री कार्यक्रमाचे अवलोकन केल्यास कोरोनाची तिसरी लाट ही लवकरच ओसरेल, असा आशावाद जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी जीवन सोनटक्के यांच्याशी बोलतांना व्यक्त केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर ही रुग्ण संख्या कमी होत आली आहे. आता या रुग्ण संख्यामध्ये कमालीची घट झाली आहे. परंतु, या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, आणि ही सर्वात जास्त चिंतेची बाब आहे. तर दुसरीकडे कोरोना महामारीची तिसरी लाट लवकरच येणार असल्याची शक्यता आरोग्य विभागातील तज्ञांनी व्यक्त केली आहे. ज्याप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट ही लवकर ओसरली त्याचप्रमाणे तिसऱ्या लाटेवर ही विजय मिळवण्यासाठी नागरिकांनी आधी पेक्षा जास्त सजग राहणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले आहे.
ज्याप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये नागरिकांनी त्रिसूत्री कार्यक्रमाचा अवलंब केला. त्याचप्रमाणे तिसर्या लाटेत आहे किंवा ती येण्याआधी त्रिसूत्री कार्यक्रम सतत सुरू राहिल्यास तिसरी लाट रोखण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. या त्रिसूत्री कार्यक्रमांमध्ये नेहमी मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे याचा अवलंब केल्यास तिसरी लाट आपण लवकरच परतवून लावू शकतो, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.