अकोला - लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांची संपत्ती २०१४ च्या निवडणुकीतील जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये २ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्याही संपत्तीमध्ये दीड कोटींची वाढ झाली. तसेच काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या संपत्तीत ६३ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. या सर्व उमेदवारांनी २०१४ मध्ये जाहीर केलेल्या पत्रात संपत्ती संदर्भात माहिती दिली होती.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर भाजपच्या वतीने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी अर्ज सादर केले. त्यांनी दिलेल्या विवरणपत्रात संपत्ती संदर्भात माहिती दिली आहे.
भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या कुटुंबाकडे ६ कोटी ९२ लाख २१ हजार ४६७ रुपयांची संपत्ती आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ५ कोटी १ लाख ५५ हजार ४५४ रुपये तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांच्या कुटुंबाकडे १ कोटी ८९ लाख ६४ हजार १५२ रुपयांची संपत्ती आहे.
लोकसभा २०१४ च्या निवडणुकीत त्यांच्याकडे ४ कोटी ८५ लाख १ हजार ६३५ रुपयांची संपत्ती होती. गत ५ वर्षात त्यांच्या संपत्तीत २ कोटी ७ लाख १९ हजार ७३२ रुपयांची वाढ झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नुसार त्यांच्या कुटुंबाकडे ५ कोटी १ लाख ५५ हजार ४५४ रुपयांची संपत्ती आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांच्याकडे ३ कोटी ५७ लाख १६ हजार ८४० रुपयांची संपत्ती होती. त्यांच्या संपत्तीत १ कोटी ४४ लाख ३४ हजार ६१४ रुपयांची वाढ झाली आहे.
काँग्रेसचे हिदायत पटेल यांच्या कुटुंबाकडे १ कोटी ८९ लाख ६४ हजार १५२ रुपयांची संपत्ती आहे. २०१४ च्या निवडणुकीत यांच्याकडे १ कोटी २५ लाख ७६ हजार २८७ रुपयांची संपत्ती होती. म्हणजेच त्यांची संपत्ती ६३ लाख ९१ हजार ८६५ रुपयांनी वाढली आहे. तिन्ही उमेदवारांच्या संपत्तीत जमिनीच्या दरांमध्ये गत पाच वर्षात झालेल्या वाढीचा यामध्ये मोठा वाटा आहे.