अकोला - ‘अस सासर नको ग बाई’ असे म्हणणार्या सूना ( judge examination Jaya Janjal success ) आपण पाहतो. परंतु, सासरलाच माहेर माणून सासरच्या मंडळीची काळजी घेणार्या सूनबाईपण आपण पाहिल्या आहेत. अशा सुनांनी समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. असाच आदर्श निर्माण केला आहे, अकोल्यातील जंजाळ कुटुंबातील सूनेने. सासरच्या मंडळीकडून तिला मिळालेल्या साथीमुळे ती न्यायाधीश परीक्षेमध्ये राज्यातून प्रथम आली आहे. तिच्या यशामध्ये सासूचा सिंहाचा वाटा असल्याचे तिने सांगून ‘अशी सासू हवी ग बाई’ असे ती म्हणत आहे.
हेही वाचा - संतप्त नातेवाईकांनी अधिष्ठातांच्या कक्षासमोर ठेवला मृतदेह, अवहेलना केल्याचा आरोप
एखादी मुलगी सासरी आली की, तिला घरातील कामांपासून वेळ मिळत नाही. त्यासोबतच तिला सासू सासरे आणि इतर नातेवाईकांकडून त्रास दिल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे, सासरी गेलेल्या मुली या माहेरी परत कधी जातो, असा प्रश्नच त्यांना पडत असतो. तसेच, सासरवासामधून कधी सुटका होते, अशीच इच्छा त्या मनोमनी करीत असतात. परंतु, अकोल्यातील एक सासर असे आहे की, ज्यांनी त्यांच्या सूनेला उच्चशिक्षित करीत न्यायाधीश बनविण्याचाच चंग बांधला होता. त्या कुटुंबाने सुनेला मुलीसारखे सांभाळून तिला स्वत:च्या पायावर उभे केले. या कुटुंबाचे आता सर्वत्र कौतूक होत असून, त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
मलकापूर येथील कोठारी वाटीका येथे राहणारे भगवान जंजाळ आणि उषा जंजाळ यांना दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांचे त्यांनी थाटात लग्न केले. शुभम जंजाळ यांची पत्नी जया ठाकरे जंजाळ यांनी सासरी पाय ठेवताच या कुटुंबात नवचैतन्य निर्माण झाले. त्यांचे सासू सासरे यांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी परवानगी देत त्यांच्या अभ्यासासाठीही घरातील कामे करण्यास निर्बंध लावले.
जया यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर 2018 मध्ये एलएलबी केली. त्यामध्ये त्या अमरावती विद्यापीठातून प्रथम आल्या. त्या एलएलएममध्ये 2020 या वर्षी उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर वकिली पेश्याकडे न वळता न्यायाधीश पदाच्या परीक्षेसाठी अभ्यासाला सुरवात केली. कुठलीही खासगी शिकवणी न लावता घरातच दररोज 15 तास अभ्यास करून त्यांनी दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) या परीक्षेत राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या परीक्षेमध्ये त्यांनी 250 पैकी 178 गुण प्राप्त केले आहे. या यशामध्ये त्यांना त्यांचे सासरे भगवान जंजाळ, सासू उषा जंजाळ यांचा सिंहाचा वाटा आहे.
जया ठाकरे जंजाळ या न्यायाधीश पदाच्या परीक्षेचा अभ्यास करीत असताना घरातील संपूर्ण जबाबदारी त्यांच्या सासू उषा जंजाळ यांनी सांभाळली. त्यांच्या साडेपाच वर्षांच्या मुलाचाही त्यांनी सांभाळ केला. गेल्या दोन वर्षांपासून त्या या परीक्षेचा अभ्यास करीत होत्या. कोणत्याही खासगी शिकवणी न लावता स्वत:च्या बळावर त्यांनी हे यश साध्य केले असल्याचे जया ठाकरे जंजाळ या अभिमानाने सांगतात.