अकोला - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. आरोग्य विभाग, महापालिका, पोलीस विभागही त्यासाठी धजावत आहे. जुने शहरातील आंबेडकर नगर येथील क्रीडांगणावर महापालिकेने रविवारचा बाजार भरवण्यासाठी व्यावसायिकांना विशिष्ट अंतर सोडूनच दुकान थाटण्यासाठी आखणी करून दिली. त्यानुसार आज (रविवारी) दुकाने लावण्यात आली होती. तसेच ग्राहकांनाही सामाजिक अंतर ठेवण्याचे सूचनाही दिल्या होत्या. बाजारामध्ये महापालिकेच्या आदेशाचे व्यवसायिक आणि ग्राहकांनी पालन केल्याचे दिसले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे ही महत्त्वाची बाब आहे. त्यानुसार नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग, वेळोवेळी हात धुणे तसेच सॅनिटायझरचा उपयोग करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. संचारबंदी असतानाही सोशल डिस्टन्सिंग किंबहुना सामाजिक अंतर ठेवण्याचे सांमजस्य नागरिकांमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने जुने शहरातील आंबेडकर क्रीडांगणावर असलेल्या बाजारात सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी बाजार बसण्या आधीच तेथे व्यावसायिकांना आखणी करून दिली.
हेही वाचा - संचारबंदी तोडत टिकटॉकवर पोलिसांविषयी असभ्य भाषेत व्हिडिओ, डोंगरीतील दोघांना अटक
आखणीमध्ये व्यावसायिकांनी बसून आपला व्यवसाय करण्याचे आदेश दिले. त्यासोबतच येणाऱ्या ग्राहकांना ही सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देऊन त्या प्रकारची आखणी ही महापालिकेच्या बांधकाम विभागाने बाजारांमध्ये करून दिली होती. मनपाच्या या परिश्रमाला आज (रविवारी) ग्राहक आणि व्यावसायिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग पूर्णपणे करण्यात आल्याचे दिसून आले.