अकोला - पॅरोलवर सुटून आलेल्या आरोपीने त्याच्या वहिनीवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. अमोल कावरे असे आरोपीचे नाव असून संध्या प्रकाश कावरे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी हा पत्नीच्या हत्येची शिक्षा भोगत असून तो सद्या पॅरोलवर आहे.
खदान पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या संतनगर येथील साईबाबा कॉलनीमध्ये संध्या प्रकाश कावरे या राहतात. त्यांच्या घरी त्यांचा दीर अमोल कावरे हा काही दिवसांपूर्वी पॅरोलवर सुटून आला होता. त्याने त्यांच्यावर अचानकपणे चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. तातडीने जवळपासच्या नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करून घटनेची माहिती पोलिसांना माहिती दिली असून हल्ला करून पसार झालेला अमोल कावरे याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी जखमी महिलेचे पती प्रकाश कावरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जीवे मारण्याचा गुन्हा दाखल केला असून जखमी महिलेवर शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांनी दिली आहे.
आधी पत्नीचा केला होता खून -
अमोल कावरे याने सात ते आठ वर्षाआधी पत्नीच्या डोक्यावर मुसळी मारून तिचा खून केला होता. या घटनेत तो शिक्षा भोगत असून तो सद्या पॅरोलवर सुटून आला होता.