अकोला - कोरोनामुळे संचारबंदीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा फटका व्यापारी व मजूर वर्ग यांनाही बसला आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि फळ खरेदीला परवानगी असली तरी व्यापारी ज्या प्रमाणात खरेदी करायचा त्या प्रमाणात खरेदी करू शकला नाही. किंबहुना खरेदी करण्यासाठी आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. संपूर्ण माल शेतात खराब झालेला आहे. तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील गजानन देविदास धनगर यांनी त्यांच्या शेतातील तीन एकर शेतात पिकवलेले टरबूज (कलिंगड) विकले न गेल्याने रस्त्यावर फेकले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीचे परवानगी शासनाकडून देण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही. तर अनेक व्यापारी हे माल खरेदीसाठी पुढे आले नाही. ज्या छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांचा माल विकला गेला. त्यांना थोडासा तरी आर्थिक फायदा झाला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या माल विकला गेला नाही त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या आहे.
तेल्हारा तालुक्यातील बेलखेड या गावांमधील गजानन धनगर यांना या परिस्थितीचा सोसावा लागला आहे. गजानन धनगर यांनी त्यांच्या तीन एकरांच्या शेतामध्ये टरबूज पिकवले होते. दोन लाख रुपये खर्च त्यांनी या टरबूजसाठी केला होता. दिवस-रात्र करून त्यांनी हे पीक चांगले उगवले होते. या पिकाला बाजार भाव मिळेल आणि व्यापारी हा माल खरेदी करायला येतील, असे त्यांना वाटले होते. मात्र, कोरोनाच्या लाटेमध्ये संचारबंदी लावण्यात आली. परिणामी, व्यापारी माल खरेदी करण्यासाठी आला नाही. त्यामुळे तीन एकरातील हे टरबूज शेतातच पडून राहिले. ग्रामीण भागातील बाजारही बंद असल्यामुळे तेथेही टरबूज विकता आले नाही. यामुळे गजानन धनगर यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. परिणामी, शेतात पडून असलेले हे टरबूज त्यांनी विकले न गेल्यामुळे रस्त्यावर फेकून दिले आहेत. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा - अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानेच फेक अकाऊंट बनवून पैशाची मागणी