अकोला - जिल्ह्यातील पातूरच्या 'किड्स पॅराडाईज' शाळेत मंगळवारी विद्यार्थ्यांचा सत्ता स्थापनेचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत लोकशाहीचे धडे गिरवण्याचा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील पातूरच्या किड्स पॅराडाइज पब्लिक स्कूलमध्ये राबविण्यात आला. नुकतेच शालेय मंत्रिमंडळासाठी येथे निवडणूक पार पडली. या निवडणुकीत उमेदवार, बॅलेट पेपर आणि निवडणूक जिंकल्यानंतरचा जल्लोषही होता. तर, त्यानंतर सत्ता स्थापनेचा शपथविधी सोहळाही पार पडला. या शालेय मंत्रिमंडळाच्या सोहळ्यात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रीही होते.
या शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीत एकूण ८३ उमेदवार रिंगणात उभे होते. त्यापैकी १६ उमेदवार विजयी झाले, ९ मते अवैध झाली आणि ७ जणांनी नोटा या मतांचा वापर केला. त्यामध्ये श्रावणी खरडे, यश महल्ले, गार्गी ढोकणे, तन्मय महोकार, आनंद राठोड, गौरी इंगळे, सायली खेडकर, श्रेयश बगाडे, योजना उगले, हर्षल वानखडे, सिद्धी पाकदुने, अनिकेत घोरे, खुशी राठोड, अनिकेत ढाळे, गौरव बंड, गायत्री पेंढारकर आदी विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यावेळी विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेचे संस्थापक गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी सत्कार केला. निवडून आलेल्या उमेदवारांमधून शालेय मंत्रिमंडळ तयार करण्यात आले. या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संविधान दिनाचे औचित्य साधून उत्साहात पार पडला.
हेही वाचा - दोन घरातून चोरट्यांचा ५ लाखांवर डल्ला; खदान पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
सर्वप्रथम संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांच्या हस्ते संविधानाचे पूजन करण्यात आले. यावेळी शपथविधीची संपूर्ण प्रक्रिया या उपक्रमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. राज्यपाल म्हणून नियुक्ती केलेल्या पार्थ वानखडे या विद्यार्थ्याने या मंत्रिमंडळाला सुरक्षिततेची व गोपनीयतेची शपथ दिली. शाळेचे तयार केलेले संविधान वाचून त्यावर सर्व नवनिर्वाचित मंत्रिमंडळाच्या सह्या घेण्यात आल्या. राज्यपालाचे सेवक म्हणून सौम्य पेंढारकर याने तर, पोलीस निरीक्षक म्हणून वैष्णवी पेंढारकर यांनी काम पाहिले. राष्ट्रगीताने या समारोहाची सुरुवात करण्यात आली आणि सांगतासुद्धा राष्ट्रगीतानेच झाली. या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे प्रत्यक्ष धडे गिरवल्याचा आनंद घेतला.
हा शपथविधी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, प्रगती टाले, सुषमा इनामदार, भाग्यश्री तुपवाडे, नितु ढोणे, सविता गिराम, सुलभा परमाळे, नरेंद्र बोरकर, सुलभा तायडे, शीतल कवळकार, तुषार नारे, पूनम फुलारी, गायत्री बराटे, प्रणाली उपर्वट, सै. वकार, आशा ढोकणे, वंदना पोहरे, अर्चना अढाऊ, शुभम पोहरे, रुपाली पोहरे, अनुराधा उगले आदींनी परिश्रम घेतले.
हेही वाचा - कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत मनपा उदासीन, शेतीसाठी पाण्याची मागणी